शारदीय नवरात्र 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात उपवास, नामजप,पूजा,भंडारे, जागरण दांडीया आदी मातेचे भक्त मोठया उत्साहाने सहभागी होतात.
तर या लेखामध्ये आपण विदर्भातील प्रसिध्द अशा माता मंदिरांची माहिती घेऊया…
- अमरावतीची अंबादेवी :-
या मंदिराची प्राचीनता सहजतेने लक्षात येते. एकवीरा अंबादेवीचे मंदिर सुंदर व मोठे बांधण्यात आले आहे. निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी आख्यायिका आहे की,17 व्या शतकात इ.स. 1640 च्या सुमारास देवीचे भक्त श्री जनार्दनस्वामी अमरावतील आले. अंबा नाल्याचे जागी त्यावेळी एक ओढा होता. त्याचे काठी निसर्गरम्य वातावरणात त्यांचा मुक्काम होता. तीरावर त्यांची पर्णकुटी होती. ते रोज जगदंबेचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नसत. एकदा पावसाळ्यात अंबा नाल्याला पूर आला, त्यामुळे त्यांना जगदंबेचे दर्शन घेणे अशक्य झाले. स्वामींनी तीन दिवस अन्न-पाणीही घेतले नाही. तेव्हा श्री जगदंबेने त्यांना दृष्टांत दिला व अशी आकाशवाणी झाली की, ‘ज्या विहिरीचे पाणी तुम्ही स्नानसंध्येसाठी घेता तिच्या काठावर जो बाण आहे-तो बाण म्हणजे मीच होय. त्याची प्राणप्रतिष्ठा करून दर्शन घ्यावे, असे सांगतात. स्वामींनी त्याप्रमाणेच केले .
तीच आजची एकवीरा देवी होय. या आख्यायिकेनुसार एकवीरा देवीची ही स्थापना इ.स. 1960 मध्ये झाली. पुढे मोठे मंदिर बांधण्यात आले.
नवरात्राच्या उत्सव काळात संपुर्ण महाराष्ट्रातून लोक येतात. एकवीरा-अंबामातेचा आशीर्वाद प्राप्त करतात. ही काळ्या पाषणाची मूर्ती देखणी, अप्रतिम व सुंदर आहे. भक्तांसाठी जागृत असणारी, मनोकामना पूर्ण करणारी अशी ही देवी आहे.
(2) चंद्रपूरातील माता महाकाली :-
विदर्भातील अष्टशक्तिपिठांपैकी एक शक्तिपिठ म्हणजे चंद्रपूरातील महाकालीचे मंदीर होय. येथे चैत्र महिन्यात मोठी यात्रा भरते. आज उभे असलेल्या भव्य आणि देखण्या महाकाली मंदीर निर्मितीचा इतिहास मोठाच रंजक आहे. आज जे भव्यदिव्य मंदीर दिसते, ते मंदीर एका युध्दात विजय मिळाला अन मंदीर उभे राहिले याचे दाखले इतिहासात सापडतात. महाकालीचे मंदिर चंद्रपुरातील गोंडराजांच्या इतिहासाची साक्ष देत उभे आहे. अतिशय देखणे असलेल्या या मंदीरात नवरात्रीच्या पर्वापासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असते. या उत्सवाला भाविक मोठया संख्येने गर्दी करीत असतात. अश्विन व चैत्री नवरात्रामध्ये मातेच्या दर्शनासाठी भाविक दूरवरून चंद्रपूरला येत असतात.
चंद्रपूरचा गोंडराजा खांडक्या बल्लाळशहा (१४७२-१४९७) हा झरपट नदीच्या कुंडात असलेले पाणी पिऊन परत जात असतांना काही पावलावर दक्षिणेस असलेल्या खडकात एक भुयार आढळले. या भुयारात खडकात कोरलेली देवी महाकालीची मुर्ती आढळली. तेव्हा राजाने भुयार उघडले आणि तेथील साफसफाई केली. त्यानंतर त्यावर छोटेसे मंदीर बांधले. एका लढाईत राजा बिरशहाने दुर्गशहा याचा शिरछेद केला.हा विजय आपणास महाकाली देवीचा कृपेने मिळाला असे समजून राणी हीराईने ( १७०४-१७१९ ) दुर्गशहाचे शिर देवीस मोठ्या समारंभाने वाहीले.कबूल केल्याप्रमाणे राणी हीराईने जूने देऊळ पाडून नविन मंदीर बांधले..राणी हीराईने बांधलेले हे मंदीर भव्य आणि देखणे आहे.
(3) नागपूरची कोराडीची देवी :-
कोराडीची देवी ही विदर्भातील प्रसिद्ध देवी आहे. नागपूर शहरापासून दक्षिणेस अवघ्या 20 किमी अंतरावर असलेले कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर हे अनेक भाविकांचे शक्तीपीठ आहे. विदर्भासह लगतच्या राज्यामधून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. नवसाला पावणारी आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून कोराडी निवासिनीवर भाविकांची अपार श्रद्धा आहे. ही देवी विदर्भ व मध्यप्रदेशाच्या लोकांचे दैवत आहे.
ही मूर्ती स्वयंभू आहे, असे मानले जाते, म्हणजे तीची स्थापना झाली नाही. विशेष म्हणजे आई जगदंबाच्या मूर्तीचे रूप प्रत्येक वेळी बदलत राहते. सकाळी मुलगी म्हणून, दुपारी तारुण्याच्या रूपात आणि रात्री प्रौढ म्हणून.
कोराडी येथील जगदंबा मातेचे मंदिर सुमारे दीडशे एकर परिसरात पसरलेले आहे. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे आईचा दरबार चांदीचा बनलेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने पर्यटनस्थळांच्या यादीत त्याचा समावेश केला आहे. काही वर्षांपूर्वी या मंदिराला भव्य स्वरूप देऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
(4) वैरागडची महाकाली (गोरजाई) मंदिर :-
वैरागड गाव हे गडचिरोली जिल्हयातील आरमोरी तालुक्यांत आहे. खोब्रागडी आणि सातनाला या नदीच्या संगमावर आहे. हे मंदिर गावाच्या दक्षिणेस सुमारे १ कि.मी. अंतरावर स्थानिक शिव तलावाच्या जवळ असून सात नदीच्या किनाऱ्यावर आहे. कॅनिहॅमने या मंदिराची पहाणी इ.स. १९७३-७४ मध्ये केली होती. ही मूर्ती प्राचीन असून रोगनिवारक म्हणून प्रसिद्ध आहे. कॅनिहमच्या मते या मंदिराचे काम दोन टप्प्यात पुर्ण झाले. मंदिर पूर्वाभिमुख असून बांधकाम मुरमी पाषाण वालूका पाषणांतील आहे. अत्यंत प्राचीन असले तरी नक्षीकाम अत्यंत देखणे आहे. गर्भगृहात अष्टभूजी उभी असलेली देवीची मूर्ती आहे. तीने हातात खडग, कपाल, डमरू, ढाल आणि कमळ इ. आयुधे धरले आहे. ही देवी महाकाली म्हणून प्रसिद्धी आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार अगदी साधे आहे. द्वारपट्टीकेवर नक्षीकाम नाही, कमळाचे अंकन कोरले आहे त्यावरून हे मंदिर महाकालीचे मंदिर लोकश्रद्धेचा विषय बनले आहे. या ठिकाणी नवरात्रात व चैत्रात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते.
(5) भवानी मंदिर भटाळी –
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या तालुक्यात भटाळी या गावात अत्यंत प्राचीन हे महालक्ष्मीचे मंदिर आहे. चिमूर रोडवर सालोरा फाट्यापासून ५ कि.मी. अंतरावर आहे. हे गाव इ.स. ४५ व्या शतकापासून अस्तित्वात होते, हे येथील शैलग्रह व शिल्पावरून कळते. अश्मयुगीन मानवाचे हे स्थान होते असे पुरातत्वीय अण्वेशनात मिळालेल्या पाषाणावरून कळते. भवानी मंदिर ला भेट दिली असता हे मंदिर आजही चांगल्या अवस्थेत आहे. याचा मंडप शुदमंडप असून मोठा आहे. दोन्ही बाजुस कक्षासन आहे. मध्यभाग गोलाकार अष्टकोनी आणि त्यानंतर कुंभाची रचना आहे. अशाप्रकारचे मंदिर अत्यंत दुर्मिळच आहे. गर्भगृहात भवानी देवीचे शिल्प आहे. देवीचे रुप देखणे आहे. रुप, अत्युध आणि अन्य अलंकाराने स्पष्ट दिसत नाही. गर्भगृह हे दक्षिणेत असून प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. मंडप कक्षासनयुक्त आहे. मुख्यद्वार उत्तरेस व दुसरे पूर्वेस आहे. अनेक देवताच्या कोरीव प्रतिमा आहे. हे मंदिर इ.स. ११-१२ शतकातील असावे. महालक्ष्मीची कमान आहे. त्यामुळे हे महालक्ष्मीचे देऊळ आहे. नवरात्र, चैत्रात दर मंगळवारी यात्रा भरते. भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.