Dr Ambedkar Jayanti 2024: डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाते. यंदा संपूर्ण देश त्यांची 133वी जयंती साजरी करत आहे.
भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार
१४ एप्रिल रोजी डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. डॉ. भीमराव आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहे. त्या काळात समाजात अनेक गोष्टी अस्पृश्य मानल्या जात होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, शोषित, मागासलेल्या लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान विचारवंत, समाजसुधारक, न्यायशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकारही म्हटले जाते.
बाबासाहेबांचे जीवन संघर्षमय होते….
डॉ. आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महु या गावी झाला. त्यावेळी भारतातील जातिव्यवस्था अतिशय कठोर असल्याने त्यांना लहानपणापासूनच जातीभेदभावाला सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी अतिशय अभ्यास करुन देशात व पदरेशात शिक्षण घेतले. त्यांनी शिक्षणात प्रावीण्य मिळवले आणि कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. याशिवाय लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर ते भारतात परतले आणि कायद्याचा सराव सुरू केला.
बाबासाहेबांचे महिला विषयक कार्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचे कट्टर समर्थक होते. भारतीय समाज व्यवस्थेत घट्ट रुजलेली विषमता नष्ट करण्यासाठी झटणार्या बाबासाहेबांना स्त्रियांवर होणारे अन्याय- अत्याचार अस्वस्थ करत होते. स्त्रियांचे त्यांच्या मनाविरुद्ध झालेले विवाह आणि लादली जाणारी बाळंतपणे याचाही परिणाम दिसत होता. ही परिस्थिती बदलण्याचे एकमेव प्रभावी साधन म्हणजे शिक्षण, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. हा विचार समाजात रुजण्यासाठी त्यांनी आपल्या लेखांतून-व्याख्यानांतून अनेकदा मांडणी केली.
स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्री म्हणून बाबासाहेबांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणाचे अनेक निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली. खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणार्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि २० वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्तिवेतनाची तरतूद यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करायला हवा.
बाबासाहेबांचे संविधानातील योगदान
भारतीय नागरिकांना समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि समान संधी च्या अमंलबजाणी करीता संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची अतिशय महत्त्वाची भूमिका राहलेली आहे. मूलभूत अधिकार, संघराज्य रचना आणि अल्पसंख्याक आणि वंचितांसाठी संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी विशेषत: धार्मिक स्वातंत्र्य, अस्पृश्यता निर्मूलन आणि शोषणापासून संरक्षण यांसारख्या अधिकारांवर भर दिला.
एक मजबूत केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये अधिकारांचे विभाजन सुनिश्चित करण्यासाठी बाबासाहेबांनी संघराज्य पद्धतीचे समर्थन केले. अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षणासाठी देखील त्यांनी कार्य केले. भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्ती, आंबेडकर हे एक न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक देखील होते.
- बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक लोकशाहीचा मार्ग आपल्याला समतेवर आधारित जग निर्माण करण्याची प्रेरणा देईल. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!