भारतरत्न पुरस्कार 2024 : भारतात सवौच्च पुरस्कार मधील भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे आणि हा पुरस्कार बिहारमधील समाजवादी राजकारणी माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना प्रदान करण्यात आला आहे. याबाबत पंतप्रधान मोदींनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कर्पुरी ठाकूर यांचा जन्म
कर्पुरी ठाकूर यांचा जन्म बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यीतल पिंतौझिया म्हणजेच आताच्या कर्पुरीग्राममध्ये 24 जानेवारी 1924 रोजी झाला. कर्पुरी ठाकूर स्वातंत्र्यसैनिक तसेच शिक्षक होते. कर्पुरी ठाकूर 1970 च्या दशकात दोनदा बिहारचे मुख्यमंत्री होते. मंडल आंदोलनापूर्वी ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण दिले होते. लोकनायक जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया हे त्यांचे राजकीय गुरू होते.
1952 मध्ये ते बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि 1988 पर्यंत ते 36 वर्षे बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून काम केलं. या काळात त्यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं. एवढी मोठी राजकीय कारकीर्द असली तरीही कर्पूरी ठाकूर हे सर्वात गरीब नेते म्हणून ओळखले जात होते.
कर्पुरी ठाकूर बिहारचे जननायक
जननायक कर्पुरी ठाकूर यांची ओळख स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, राजकीय नेता अशी राहिली. पण, त्यांना जनता जननायक या नावानं ओळखत होती. त्यांना खरच जननायक ही पदवी शोभणारी होती. एखाद्या राज्याचा दोनवेळा मुख्यमंत्री आणि एकदा उपमुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती किती गरीब असू शकतो. इतका गरीब की त्याच्याकडे त्याची गाडी नसावी. गाडीचं सोडून द्या स्वत:चं चांगलं घर देखील नसावं. या नेत्यानं स्वत:चं चांगलं घर बांधलं नाही.
सरकारी खर्चानं उपचार न करणारा नेता
कर्पुरी ठाकूर यांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. 1974 मध्ये कर्पुरी ठाकूर यांच्या मुलाची निवड जेव्हा मेडिकलसाठी झाली होती. मात्र, तो आजारी पडला होता. त्याला दिल्लीच्या राममनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या ह्रदयावर शस्त्रक्रिया होणार होती. आणि उपचार हे परदेशात होणार होते आणि हा संपुर्ण खर्च खर्च शासकीय खर्चाअंतर्गत होणार होता परंतु तो खर्च त्यांनी नाकारला त्यांनी “मरुन जाऊ, पण मुलावरं सरकारी खर्चानं उपचार करणार नाही” असं सांगितलं.
गाडीही न घेता असलेला नेता
कर्पूरी ठाकूर 1970 ते 71 या काळात मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना जावई शोधण्यासाठी रांचीला जावे लागले. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत वाहन न वापरता टॅक्सी करून रांचीला गेले.
कर्पूरी ठाकुर यांच्या मुलीचं लग्न अगदी साधेपणाने झालं. त्यांनी त्या लग्नासाठी कोणत्याही नेत्याला किंवा त्यांच्या मित्रांना बोलाविले नाही. एवढेच नाही तर मुख्यमंत्र्यांसोबत राहणारे सुरक्षा कर्मचारी आणि जिल्हा प्रशासनातील कुणीही त्या लग्नासाठी उपस्थित नव्हते.
कर्पूरी ठाकूर इतके दिवस आमदार आणि मुख्यमंत्री राहिले पण त्यांना गाडीही घेता आली नाही.
कर्पूरी ठाकुर यांची बुधवारी म्हणजे 24 जानेवारी रोजी शंभरावी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.